प्रदूषण जोपर्यंत उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रदूषणाची तीव्रता कळत नाही. त्यामुळेच दिल्ली आणि उत्तर भारतात प्रदूषणाच्या मुद्दयांवर ज्या प्रमाणात काम होत आहे तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्रात होताना दिसत नाही. याचं कारण आपल्याला आपल्या शहरात किती प्रदूषण आहे हे ठळकपणे दिसून येत नाही. सरकारी पातळीवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) अशा संस्थांकडून हि माहिती Air Quality Index च्या माध्यमातून त्यांच्या वेबसाईटवर रोज Publish केली जाते. पण सक्रियपणे स्वतः जाऊन रोज हि माहिती कुणी बघत नाही.

लोकांमधील आणि उपलब्ध माहितीतील हेच अंतर भरून काढण्यासाठी झटका आणि वातावरण या संस्थांनी मिळून कृत्रिम फुफ्फुसांचा एक फलक मुंबईतील वांद्रे येथे बसवला आहे. या फलकावर एक डिजिटल Air Quality Monitor सुद्धा बसवला आहे. पुढील काही दिवसात कृत्रिम फुफ्फुसांमध्ये बसवलेल्या हेपा फिल्टर्समध्ये हवा खेचली जाईल आणि हळूहळू या फुफुसांचा रंग बदलत जाईल. आपणही जेव्हा हि आजूबाजूच्या प्रदूषित हवेचे श्वसन करतो तेव्हा आपल्याही फुफ्फुसांचा रंग असाच बदलत जातो. प्रदूषित हवेचा आपल्या आरोग्यावर कसा प्रादुर्भाव होतो हे दाखवण्यासाठीची हि कदाचित सर्वात सोपी पण परिणामकारक पद्धत आहे.

तुम्ही मुंबईचे रहिवासी असाल तर वांद्रयाच्या आर डी नॅशनल कॉलेजच्या बाहेर लावलेला हा फलक बघायला नक्की जा.